कोरोना महामारी काय शिकवते?
*कोरोना महामारी काय शिकवते?*
महामारीचा उगम हा नैसर्गिक याबरोबरच मानवनिर्मित असू शकतो हे बदलत्या काळाने सिद्ध केले आहे.
थोर विचारवंत व अभ्यासक असं मानतात की 'प्रत्यक्ष अस्तित्वाला आव्हान देणारी संकटे आली तर आपल्यात असलेली शक्ती अजमावता येते'. प्रलय हा बऱ्याचदा नैसर्गिक असला तरी काही अंशी उन्माद कारणीभूत होतो. निसर्ग नेहमीच समतोल साधण्याचा प्रयत्न करतो साधतो प्रयत्न. प्रत्येक जीवाचा निसर्गावर समान अधिकार. पशुपक्षी, पर्वत, नद्या, जंगल, वृक्ष जलचर, जीवजंतू आणि माणूस निसर्गाने सर्वांना आपले वास्तव्यस्थान नेमून दिलेय. नियमाचा भंग केला तर प्रकोप निश्चित, हा आतापर्यंतचा इतिहास.
बुद्धिमान आणि शक्तिशाली माणूस समुद्र तळाखाली आणि परग्रहापर्यंत पोहचलाय. इतिहासात अनेक उलथापालथी, महामारी येऊन गेल्या, प्रजाती नष्ट झाल्या, काही नामशेष होण्याच्या मार्गावर, पण माणूस मात्र प्रगतीच्या दिशेने चाललय. कोरोना महामारी आजच्या पिढीला अनोखी. अनेकदा काल्पनिक कथा, चित्रपटांतून अनुभवलेले आभासी जग प्रत्येक जण आज जगतोय.
विचार केला होता कधी माणूसच माणसाचा शत्रू बनेल? समाजासाठी आसुसलेल्या प्रत्येकाला एकमेकांपासून लांब राहावे लागेल, आज ते प्रत्यक्ष घडतयं. गांधीजी म्हणायचे 'खेड्याकडे चला' आता कळले असेल खेड्याचे महत्त्व. विकासाच्या नावाखाली गर्दी केलेल्या शहरात एक मीटरचे अंतर राखायला जागा तरी आहे का? सूर्योदय आणि सूर्यास्त कसा असतो हे माहीत नसणाऱ्या आधुनिक माणसाला निसर्गाकडे डोळे उघडे ठेवून बघायला लॉक डाऊन ही जणू शिक्षाच. कोरोनासारख्या महामारीत प्रचंड हानी होणार बेरोजगारी गरिबी वाढणार हे निश्चित. त्याला रोखणे कठीण, पण अलौकिक प्रतिभाशक्ती, सामर्थ्य, ऊर्जा असणारे अशा प्रतिकूल परिस्थितीतून नवनिर्माण करून दाखवतात. जगाची अर्थव्यवस्था कोलमडणार, अमेरिका, चीन, जपान, स्पेन, इटली, इतर सर्व महाशक्ती डगमगले असताना भारत स्वतःला सावरून इतरांना मदत करण्याचे धैर्य आणि औदार्य दाखवतो का हे पुढील काळच ठरवेल. विकसित चीन जागतिक अरिष्टाचे कारण ठरला आणि त्याचे स्वार्थीपणाचे कृत्य आत्मघातकी ठरणार. चीनमधून विस्थापित होणाऱ्या कंपन्यांना आसरा दिला तर भारत जागतिक बाजारपेठ बनू शकेल, हे चाणक्यनीतीने हेरले तर पुन्हा एकदा सुवर्णकाळ आणता येऊ शकेल. परंतु फक्त चिखलफेकीचे राजकारण आणि धर्मांधतेने बरबटलेल्या व्यवस्थेला त्याचे बारकाईने अवलोकन करता आले पाहिजे. दूरदृष्टीने राबविलेले राष्ट्रीय कार्यक्रम, पोलिओ, धनुर्वात असे अनेक आजार आपण हद्दपार केलेत. अमेरिकेसह इतर अनेक देश हायड्रोक्लोरोक्वीन सारखी औषधांसाठी आपल्याकडे मदतीची याचना करतात, याचा अर्थ आपल्या पूर्वजांनी त्यात किती योगदान दिलंय हे सिद्ध होतं. संशोधनाची गरज आणि ती क्षमता आपल्याकडे आहे आणि त्यात प्रभावी लस सर्वात आधी शोधून भारत सर्वश्रेष्ठ ठरू शकतो. वैद्यकीय क्षेत्राला आग्रस्थानी मानून त्यांना सदैव सन्मान आणि प्रोत्साहन मिळणे महत्वाचे. फक्त विशिष्ट काळापुरत्याच टाळ्या आणि थाळ्या वाजवून उपयोग नाही तर गरज संपल्यावर होणारी आवहेलना आणि अवमान सामाजिक मानसिकतेतून संपला पाहिजे. कोरोना ने ज्या वैद्यकीय क्षेत्रातील लोकांची 'फ्रंट लाईन वॉरिअर' म्हणून ओळख करून दिली ती कायमस्वरूपी जागृत ठेवण्याचे आव्हान सर्वांसमोर उभे केले आहे.
शेतकरी जगला तरच ताटात अन्नाचे दोन घास मिळतात. आजच्या स्थितीला नुकसान सोसून सर्वांचा पोशिंदा घाम गाळतोय. असे म्हणतात "लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे". शेतकऱ्यांना दुय्यम समजणारे आज शेतकऱ्यामुळेच जिवंत राहू शकतात. म्हणून पुढच्या काळात शेतीला प्राधान्याने लक्ष देऊन ग्रामीण भाग विकसित करण्याची गरज कोरोना ने लक्षात आणून दिलीय. आज तेच एक सुरक्षित क्षेत्र सर्वांसाठी शिल्लक आहे. अनोखे संकट उभे ठाकल्याने पूर्ण यंत्र-तंत्र तोकडी पडू लागली, फवारणी मशीन, व्हेंटिलेटर, वैद्यकीय उपकरणे इत्यादींचा अचानक झालेला तुटवडा भरून काढण्यासाठी नवीन तंत्र विकसित करायला शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ यांना भरपूर वाव आहे. संधी शोधत जगभर फिरणाऱ्या हुशार चलाख विज्ञानवादी पिढीला भारतासाठी नेमके संशोधन करून चमक दाखवण्याची हीच वेळ. शिक्षण हे फक्त चार भिंतीत राहूनच नाही तर इंटरनेटचा वापर करूनही आपण शाळा कॉलेज ऑनलाईन परीक्षा चालवू शकतो का? हे अचूकपणे आजमावून प्रयोगाची ही वेळ. ऑनलाइन सेमिनार, वेबिनार ही याची सुधारित आवृत्तीच म्हणावी लागेल. अशाप्रकारची निर्दोष शिक्षण प्रणालीने वेळ भरून काढता येईल. मनन चिंतन लेखन करून विवेकबुद्धीने विचार कसा करावा हे समाजाला शिकवण्याची विचारवंतांना नामी संधी. उगाच फालतू विनोद, सुमार दर्जाची अफवा पसरवणारे माहिती पसरविणे सोडले पाहिजे. दीन दुबळ्यांच्या मदतीने सामाजिक बांधिलकी जपून 'वसुधैव कुटुम्बकम' कृतीतून दाखवून देणे हे खऱ्या भारतीयाचे लक्षण. त्यासाठी ही प्रत्येकाची कसोटी ठरेल. केवळ सोशल मीडियावर देशभक्ती दाखविण्यापेक्षा खरे निस्वार्थी आणि समाजसेवक कोण हे यानिमित्ताने समोर येईलच. दुसऱ्यांना देशभक्ती चा पाढा वाचून दाखवण्यापेक्षा आपण काय दिवे लावतो हे पाहणे गरजेचे.
विकासासाठी वाढलेली शहरे, कमी जागेतील हजारो फूट उंच इमारती, जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेल्या झोपडपट्ट्या किती धोकादायक हे वास्तव समोर येतेय. जर उद्रेक झाला तर प्रेतांचा खच पडेल ही वस्तुस्थिती शहरीकरण वाढविताना दुर्लक्षित केल्याचा परिणाम ठरू शकेल हे भयानक सत्य नाकारून चालणार नाही.
नियोजनशून्यता ठेवली तर अशी संकटे येत राहतील आणि राक्षसा प्रमाणे अक्राळ विक्राळ रूप धारण करतील. अशीच उदासीनता ठेवली तर शहरे ओस पडायला वेळ लागणार नाही हे अनुभवातून शिकलं तर तो शहाणा माणूस ठरेल. नद्यांचे झालेले स्वच्छ पाणी, प्रदूषण रहित हवा, थांबलेला कर्णबधिर गोंगाट, बंद पडलेली यंत्रांची घरघर यामुळे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यात भर पडली हे प्रत्येकजण अनुभवतोय. बेशिस्त शहरांची वसाहत करताना निसर्गावर किती आक्रमण झाले हा ठार बहिरे आणि आंधळेपणा सर्वांनी येणाऱ्या काळात सोडला पाहिजे. शहरांच्या विकासासोबत ग्रामीण भागाच्या समतोलासाठी वेगळ्या संशोधनाची भविष्यात गरज लागू हे कोरोनाने दाखवलेय.
सोशल मीडिया जितका सोयीस्कर तितकाच जीव घेणारा हे माकडाच्या हाती कोलीत दिल्यासारखे ठरतेय, याचे विवेकशून्य नेटकऱ्यांनी आत्मपरीक्षण करायला पाहिजे. पैसा मिळवायचा तर माणुसकी राखून, उद्योग वाढवायचा तर निसर्गाला सांभाळून, संशोधन करायचे तर ते आरोग्यासाठी, शिक्षण द्यायचे तर संस्कारक्षम पिढी साठी, संस्कृती जपायची ती जबाबदार माणूस बनावा यासाठी. हे नियम पाळून प्रगती केली तर ती निश्चितच जीवनाची उंची वाढवेल. कोरोना आला, आता सर्वनाथ हा 'निराशावाद' सोडून 'आशावादी' दृष्टी ठेवली तर हे अमृत निर्माण करणारे हे समुद्रमंथन ठरू शकेल. समतोल साधायचा नियम निसर्ग शिकवतो व हेही सांगतो की *'संकट कधीच संधी शिवाय एकटा प्रवास करत नाही'.*
.... *डॉ. विशाल व्यवहारे*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा