लोकांची होणारी लूट कोण थांबवणार?

*लोकांची होणारी ही लूट कोण थांबवणार?*

फ्रंट लाईन वॉरियर सतत कोरोना सोबत लढाई करत आहेत, त्यांच्या शिवाय लढाई अशक्य. त्यांच्यावर वेगवेगळे नियम लावून प्रसंगी अनेक कारवाईची भीती दाखवून त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली जात आहे. हा सर्व जीवाशी असणारा खेळ. 
यात होणारा खर्चही जास्त घेऊ नये अगदी माफक दारात उपचार खर्च लावावा असेच सर्वांचे मत. 
सर्व गरीब श्रीमंत यात भरडले जात आहेत अशा वेळी गरिबांना अशा प्रकारे सवलत देणे सर्वांसाठी उचितच आहे. 
पण एकीकडे उपचार खर्चावर आरोळ्या ठोकणारे जेव्हा याच वॉरियर्स ला लागणारे साहित्य (PPE किट, सॅनिटायझर, इन्फ्रारेड थर्मामिटर इ ) जेव्हा दुप्पट तिप्पट किंमतीत विकतात तेव्हा मूग गिळून गप्प का बसतात? यावेळी महामारी चे संकटात हॉस्पिटल, दवाखाने, opd चालवण्यास होणारा खर्च चीन /अमेरिका अनुदान म्हणून देत आहे का?  जर वॉरियर्स ना अक्कल शिकवायची असेल, त्यांनी काम कशा प्रकारे करावे हे फुकटचे सल्ले द्यायचे झटके ज्यांना येत असतील त्यांनी जरा इतर होणाऱ्या लुटीकडे बघितलं तर समाजसेवा नाही का होणार? 

दुसऱ्या ठिकाणाहून रोजगारासाठी आलेले लोक भीतीपोटी आपापल्या गावी परतू पाहत आहेत. ही संख्या मुंबई, पुणे, औद्योगिक क्षेत्र येथे खूप प्रचंड प्रमाणात आहे. सरकारने परराज्यातील लोकांना सरकारी खर्चाने मूळगावी सोडवण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. हाताला काम नाही, खायला अन्न नाही, घरभाडे द्यायला पैसे नाही अशा परिस्थिती मध्ये  ह्या सुविधा देणे आवश्यकच आहे. 
गावी जाणाऱ्या  लोकांची संख्या आणि त्यांच्यासाठी केलेली वाहतूक व्यवस्था हे यांच्यात खूप मोठी दरी आहे. म्हणून लोक मिळेल त्या वाहनाने गावी जाण्याच्या तयारीत आहेत, काही जण गेलेही आहेत. यातही परिस्थितीचा फायदा घेणारे एजंट अग्रस्थानी आहेत. जेथे 1000 रुपये सामान्य स्थितीत खर्च येतो तिथे 4000 रुपये उकळले जात आहेत. अशा वेळी कोरोनाने भयग्रस्त झालेले आणि नाडलेले मजूर लोक  अजून कुणाच्या  नजरेस आले नाहीत काय? 
अजून तरी या होणाऱ्या लुटीवर कुणी समाजसेवकाने आवाज कसा उठवला नाही, परतणाऱ्या लोकांकडून जास्त पैसे उकळले म्हणून गाडीची तोडफोड केली नाही ही सुबुद्धीच म्हणावी लागेल. 
या कठीण परिस्थितीत समाजाप्रति खरी संवेदना असणाऱ्या लोकांनी शक्य होईल तेवढी मदत केली तीसुद्धा निस्वार्थ, कुठलीही जाहिरातबाजी न करता, या योगदानाबद्दल ते स्तुतीस पात्र आहेतच. परंतु जे फक्त दिखाव्यासाठी समाजसेवकाचा बुरखा पांघरात आहेत त्यांना अजूनही आपली चुणूक दाखवण्याची संधी आहे. जरा परतणाऱ्या लोकांना मदत केली,  त्यांची प्रवासखर्चावर होणारी लुटीवर काहीतरी मानपासून कृती करून दाखवल्यास  थोडेफार  तरी पुण्य पदरात पडेल. 

टिप्पण्या